भरवस्तीत चोरट्यांचे धाडस; सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह ४० हजारांची रोकड पळवली
मारवड (प्रतिनिधी):- अमळनेर तालुक्यातील कलाली येथे अज्ञात चोरट्यांनी बंद घराचा कडीकोंडा तोडून घरात प्रवेश केला आणि कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने व रोकड असा एकूण ६१ हजार ५०० रुपयांचा मुद्यामाल चोरून नेला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, तेजस गुलाब पाटील (वय २६) हे कुटुंबासह कलाली येथे राहतात. ८ मे २०२६ रोजी मध्यरात्री १२ ते पहाटे ४ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचा कडीकोंडा तोडला. चोरट्यांनी कपाट चक्क घराबाहेर ओढून नेले आणि त्यातील ऐवजावर हात साफ केला.
चोरट्यांनी कपाटातून २ ग्रॅम सोन्याची अंगठी (किंमत १४,००० रुपये), चांदीचे दोन जोड बेले, चांदीचे ब्रेसलेट आणि ४० हजार रुपये रोख असा एकूण ६१,५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.
याप्रकरणी तेजस पाटील यांच्या फिर्यादीवरून मारवड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०५ (अ) आणि ३३१ (४) नुसार घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच सपोनि जिभाऊ पाटील यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील करत आहेत.









