धरणगाव (प्रतिनिधी):- तालुक्यातील बाबुळगाव परिसरातील अंजनी नदी पात्रातून विनापरवाना वाळू वाहतूक केल्याप्रकरणी ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महसूल प्रशासनाच्या कारवाईमुळे अवैध गौण खनिज वाहतुकीवर पुन्हा एकदा कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. ४ मे २०२६ रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास बाबुळगाव येथील अंजनी नदी पात्रातून विनापरवाना वाळू भरून वाहतूक सुरू असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली होती. त्यानुसार ग्राम महसूल अधिकारी दीपक विजयसिंग पाटील यांनी घटनास्थळी पाहणी केली असता ट्रॅक्टर क्रमांक MH-19 EA-6810 मधून वाळू वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले.
या प्रकरणी समाधान विठ्ठल पाटील (रा. धरणगाव) यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), ६२ तसेच गौण खनिज अधिनियम १९५७ च्या कलम २१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासनाचा महसूल बुडवण्याच्या उद्देशाने ही वाळू वाहतूक सुरू असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोना ५८५ जितेंद्र भदाणे करीत आहेत.











