गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार; सेजल बडगुजर प्रथम


यावर्षीच्या निकालात कु. सेजल सुनील बडगुजर हिने ८८.८० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. चि. प्रथमेश संतोष वंडोळे याने ८८.२० टक्के गुणांसह द्वितीय, तर कु. सिद्धी सुनील कोथलकर हिने ८३.६० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळविला. चि. सोहम वासुदेव दवे याने ८१.४० टक्के गुणांसह चतुर्थ क्रमांक मिळविला. तसेच कु. दीक्षा विष्णू बारी व चि. उज्वल ज्ञानेश्वर नागपुरे यांनी प्रत्येकी ८१.२० टक्के गुण मिळवत पाचवा क्रमांक पटकावला.
गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष निलेश खलसे होते. प्रमुख अतिथी म्हणून शालेय समितीचे चेअरमन दिलीप बारी, सदस्य प्रवीण पाटील, उमाकांत बारी, अशोक काटोले तसेच संचालक अर्जुन काटोले उपस्थित होते. यावेळी मुख्याध्यापक राजेंद्र आंबटकर व पर्यवेक्षक सुनील भदाणे मंचावर उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्ष निलेश खलसे, चेअरमन दिलीप बारी, सदस्य प्रवीण पाटील, उमाकांत बारी, अशोक काटोले व संचालक अर्जुन काटोले यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन चंद्रकांत कुमावत यांनी केले. मुख्याध्यापक राजेंद्र आंबटकर यांनी मनोगत व्यक्त केले, तर अध्यक्षीय भाषणात निलेश खलसे यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे आभार पर्यवेक्षक सुनील भदाणे यांनी मानले.
या कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.









