जळगाव (प्रतिनिधी):- यावल तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीचा जबरदस्तीने बालविवाह लावून देऊन तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, या अत्याचारामुळे अवघ्या १५-१६ वर्षांच्या पीडितेने एका बालकाला जन्म दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मौजे सांगवी बुद्रुक (ता. यावल) येथील रहिवासी अक्षय उर्फ बंटी राजेंद्र सोनवणे (वय २६) याने पीडिता अल्पवयीन असल्याचे माहित असूनही तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. विशेष म्हणजे, पीडितेच्या स्वतःच्या माता-पित्यांनीच या कृत्यात साथ देत, राहत्या घराजवळील तिचा अक्षयसोबत विवाह लावून दिला.विवाहानंतर ‘तू आता माझी पत्नी आहेस’ असे भासवून आरोपीने तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला. या छळामुळे पीडिता गरोदर राहिली आणि तिने दि. २८ एप्रिल २०२६ रोजी एका मुलाला जन्म दिला.
हा प्रकार सोलापूर ग्रामीणमधील करमाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला होता. मात्र, घटनेचे मूळ ठिकाण जळगाव जिल्ह्यातील यावल असल्याने हा गुन्हा शून्य क्रमांकाने यावल पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.याप्रकरणी यावल पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ६४(२), (एम), ६५(१). पोक्सो कायदा कलम ४, ६, ८, १२., बालविवाह प्रतिबंधक कायदा कलम ९, १०, ११. कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे:
या गंभीर गुन्ह्याचा तपास यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मसलुद्दीन शेख करत आहेत. फिर्यादी गिरजा भरत म्हस्के (नेमणूक करमाळा पोलीस ठाणे) यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून बालविवाह आणि महिलांवरील अत्याचाराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.









