धरणगाव तालुक्यातील वराड येथील घटना
जळगाव प्रतिनिधी : गुजरातहून आनंदाने नवरीला सासरी घेऊन जाणाऱ्या कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. धरणगाव तालुक्यातील वराड फाट्याजवळ क्रुझर वाहनाचा भीषण अपघात होऊन नववधूसह तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. चाक निखळल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. धरणगाव पोलीस स्टेशनला घडण्याची नोंद घेण्याचे काम सुरू होते.

मिळालेल्या माहितीनुसार, हे वऱ्हाड गुजरात राज्यातील वापी येथून अकोल्याकडे जात होते. धरणगाव तालुक्यातील वराड परिसरात आले असता, अचानक चालत्या क्रुझर वाहनाचे पुढचे चाक अचानक निखळले. यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि वाहन थेट समोरून येणाऱ्या ट्रकला जाऊन धडकले. ही धडक इतकी भीषण होती की क्रुझर वाहन रस्त्यावरच पलटी झाले.
या दुर्दैवी घटनेत नववधूसह तिघांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. पूजा रवी वाघळकर (वय २५) – मृत नववधू, दत्तू तुळशीराम भागवत (वय ४२), जगदीश चंदूभान वाघळकर (वय ५२) अशी मयताची नावे आहेत. या अपघातात एका लहान बालकासह सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (जिल्हा रुग्णालय) दाखल करण्यात आले आहे.
प्रेम भारत वाघडकर (२४),नितेश सुरेश कटोले (३५),अमोल दामोदर गीते (३५),रवी प्रभाकर वाघोळकर (३२), तुळशीराम भीमराव भागवत (६७) हे जखमी आहेत. अंश नितेश कडोले (१४) याची प्रकृती चिंताजनक आहे.
रुग्णालयात मदतीसाठी धाव
अपघाताची माहिती मिळताच जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली असून सर्वत्र आक्रोश पाहायला मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच उप वैद्यकीय अधीक्षक डॉ. इमरान पठाण, गिरीश महाजन वैद्यकीय सहायता कक्षाचे समन्वयक शिवाजी पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जखमींना तातडीने उपचार मिळवून देण्यासाठी मदत कार्य केले. या घटनेमुळे अकोला आणि वापी परिसरात शोककळा पसरली असून, लग्नाचा आनंद काही क्षणातच दु:खात विरघळला आहे.








