चाळीसगाव रेल्वे-ओव्हर-रेल्वे उड्डाणपुलाला मंजुरी
मुंबई/चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – भारतीय रेल्वेने महाराष्ट्र राज्यातील मध्य रेल्वेच्या अखत्यारीत येणाऱ्या चाळीसगाव रेल्वे-ओव्हर-रेल्वे (RoR) उड्डाणपुलाला मंजुरी दिली आहे. सुमारे २६३.८६ कोटी रुपये खर्चाच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे चाळीसगाव परिसरातील रेल्वे वाहतुकीची कोंडी फुटण्यास मदत होणार असून, प्रवाशांच्या वेळेतही मोठी बचत होणार आहे.

सध्या धुळे बाजूकडून येणाऱ्या गाड्यांना मुख्य लाईन ओलांडून जावे लागते, ज्यामुळे मुख्य मार्गावरील वाहतुकीवर परिणाम होतो. भविष्यात चौथी लाईन कार्यान्वित झाल्यावर ही समस्या अधिक गंभीर होण्याची शक्यता होती. या उड्डाणपुलामुळे क्रॉसिंगची गरज उरणार नाही, परिणामी रेल्वे गाड्यांचा मार्ग सुटसुटीत होईल. यामुळे ‘अप’ दिशेला १५ मिनिटे आणि ‘डाउन’ दिशेला २० मिनिटांची बचत होणार आहे.
प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये
एकूण लांबी: ११.०१ किमी ट्रॅकची लांबी.
वेग मर्यादा: ताशी १३० किमी वेगाने धावणार गाड्या.
महत्त्वाची बांधकामे: प्रकल्पात २ स्थानक इमारती, १ मुख्य पूल, १६ लहान पूल, १ अंडरब्रिज आणि ५ सबवे बांधले जातील.
क्षमता: २०२९-३० पर्यंत या मार्गाची क्षमता वाढून ती भविष्यातील मागणी पूर्ण करण्यास सक्षम असेल.
मालवाहतूक: या प्रकल्पामुळे वर्षाला अंदाजे ०.६ दशलक्ष टन अतिरिक्त मालवाहतूक होण्याची अपेक्षा आहे.
आर्थिक विकासाला चालना
कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) मार्फत या प्रकल्पाचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. या उड्डाणपुलामुळे केवळ रेल्वेचा प्रवासच वेगवान होणार नाही, तर परिसरातील साखर उद्योग, सिमेंट उद्योग, औद्योगिक वसाहती आणि पर्यटन स्थळांना उत्तम कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. यामुळे खान्देशच्या आर्थिक विकासाला मोठी गती मिळण्याची चिन्हे आहेत.
“हा प्रकल्प भारतीय रेल्वेच्या पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्याच्या आणि प्रवाशांना जलद सेवा देण्याच्या वचनबद्धतेचा एक भाग आहे.”
— डॉ. स्वप्नील निला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे.









