प्राथमिक आरोग्य केंद्र, शाळा, अंगणवाडी व ग्रामपंचायतीची केली पाहणी
जळगाव (प्रतिनिधी) :- जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी सोमवार दि. २० एप्रिल रोजी जळगाव तालुक्यातील कानळदा गावास अचानक भेट देत तेथील प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी तसेच ग्रामपंचायत कार्यालयाची पाहणी केली.

मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर करिश्मा नायर यांनी जिल्ह्यातील विविध विभाग व संस्थांच्या प्रत्यक्ष भेटीद्वारे आढावा घेण्यास सुरुवात केली असून, त्याच अनुषंगाने त्यांनी कानळदा येथे अचानक भेट देत स्थानिक प्रशासनाच्या कामकाजाची माहिती घेतली.
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पाहणीदरम्यान त्यांनी रुग्णांना दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवांचा आढावा घेतला. ग्रामस्थांना दर्जेदार, वेळेवर व समाधानकारक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यास कोणतीही तडजोड सहन केली जाणार नसल्याचे स्पष्ट करत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. औषधसाठा, स्वच्छता, कर्मचारी उपस्थिती तसेच रुग्णसेवा यावर विशेष भर देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
यानंतर त्यांनी जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत माहिती घेतली तसेच त्यांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या सुविधा, पोषण आहार, शैक्षणिक साहित्य व परिसरातील स्वच्छतेची पाहणी केली. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि सुरक्षित वातावरण उपलब्ध व्हावे, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.
ग्रामपंचायत कार्यालयाच्या भेटीदरम्यान त्यांनी सरपंच, ग्रामसेवक व कर्मचाऱ्यांशी संवाद साधत ग्रामपंचायतीच्या विविध योजनांचा आढावा घेतला. कार्यालयीन दप्तर, अभिलेख, नोंदवही व प्रशासनिक कामकाजाची तपासणी करून ग्रामविकासाच्या कामांना गती देण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्या अचानक भेटीमुळे संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये कार्यतत्परतेचे वातावरण निर्माण झाले असून, जिल्हा परिषद प्रशासन नागरिकांना अधिक सक्षम व परिणामकारक सेवा देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले.









