जळगाव तालुक्यातील आव्हाणे येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी):- गिरणा नदीच्या पात्रात पाय घसरून पडल्याने एका ६६ वर्षीय वृद्धाचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना जळगाव तालुक्यातील आव्हाणे येथे घडली. गुरुवारी, १६ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून किसन रामचंद्र मोरे असे मृत वृद्धाचे नाव आहे.

किसन मोरे हे गुरुवारी सायंकाळी गिरणा नदीपात्राच्या बाजूने जात असताना अचानक त्यांचा पाय घसरला आणि ते नदीच्या खोल पाण्यात पडले. त्यांना पोहता येत नसल्याने ते पाण्यात बुडू लागले. हा प्रकार जवळच असलेल्या नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने नदीत उड्या घेऊन मोरे यांना पाण्याबाहेर काढले. नागरिकांनी त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, तेथे उपस्थित वैद्यकीय अधिकारी डॉ. रक्षा रोकडे यांनी त्यांना तपासले असता, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेमुळे आव्हाणे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.









