जळगाव विमानतळाजवळ मोठी घरफोडी
जळगाव (प्रतिनिधी):- शहरात घरफोडीच्या घटनांनी पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून, जळगाव विमानतळ परिसरातील एका उच्चभ्रू वस्तीत भरदिवसा धाडसी चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ‘तारा बिझनेस पार्क’मधील एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी १० लाख रुपयांची रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण १२ लाख १३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे.

जळगाव विमानतळाला लागून असलेल्या ‘तारा बिझनेस पार्क’ मध्ये राहणारे उद्योजक मोईज अब्बास बोहरी (वय ४८) यांचे कुटुंब १३ एप्रिल रोजी दुपारी घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. दरम्यान, दि. १३ एप्रिल दुपारी १:३० ते दि. १५ एप्रिलच्या पहाटे २:१५ वाजेच्या दरम्यान चोरट्यांनी संधी साधली.
अज्ञात चोरट्यांनी बोहरी यांच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावरील दर्शनी दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील बेडरूममधील गोदरेज कपाटाचे लॉकर तोडून त्यात ठेवलेली १० लाख रुपयांची रोकड (५०० आणि २०० रुपयांच्या जुन्या वापरत्या नोटा) आणि २ लाख १३ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण १२ लाख १३ हजार रुपयांचा माल लंपास केला.
या घटनेची माहिती मिळताच एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणपुरे आणि एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी पथकासह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे करत आहेत. अद्याप कोणत्याही आरोपीला अटक झालेली नसून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेतला जात आहे. विमानतळ परिसरासारख्या भागात एवढी मोठी चोरी झाल्यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.









