६ महिलांची सुटका, घर मालकासह दोघांवर गुन्हे दाखल

जळगाव (प्रतिनिधी) – : शहरात उच्चभ्रु वस्तीत स्पा सेंटरच्या आडून चालणाऱ्या देहविक्रीच्या व्यवसायावर जिल्हा पेठ पोलिसांनी मोठी कारवाई करत पर्दाफाश केला आहे. या छाप्यादरम्यान पोलिसांनी ६ महिलांची सुटका केली असून स्पा मालकासह जागा मालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
जिल्हा पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका स्पा सेंटर मध्ये मसाज सेवांच्या नावाखाली व्यावसायिक लैंगिक व्यापार (वेश्याव्यवसाय) चालवला जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. हा प्रकार ‘अनैतिक वाहतूक (प्रतिबंध) अधिनियम, १९५६’ अंतर्गत येत असल्याने पोलिसांनी अचानक छापा मारून ही कारवाई केली.
पोलिसांनी घटनास्थळावरून मसाज थेरपिस्ट म्हणून काम करणाऱ्या ६ पीडित महिलांची सुरक्षित सुटका केली. यामध्ये दार्जिलिंग (पश्चिम बंगाल) येथील २६ वर्षीय महिला, मणिपूर येथील ३१ व ३७ वर्षीय महिला, पूर्व सिक्कीम येथील ३० व ३१ वर्षीय महिला, आणि नेपाळच्या बांके येथील २६ वर्षीय परदेशी महिलेचा समावेश आहे. नेपाळ येथील महिलेच्या पासपोर्ट, व्हिसा स्थिती आणि सीमापार प्रवासाच्या पार्श्वभूमीची पोलीस सध्या सविस्तर पडताळणी करत आहेत.
या प्रकरणी पोलिसांनी २ जणांना आरोपी केले आहे. यात नीरज सिंह पंड्या (रा. मुखर्जी नगर, रतलाम, मध्य प्रदेश) हा स्पाचा मालक व परवानाधारक असून स्पाच्या आडून वेश्याव्यवसाय चालवणे, व्यवस्थापन करणे व सुविधा पुरवण्यामागील मुख्य सूत्रधार आहे. राजेन्द्र पुंडलिकराव चव्हाण (रा. यशवंत कॉलनी, रिंग रोड, जळगाव) हा जागेचा मालक व परवानादाता असून त्याने बेकायदेशीर कारवायांसाठी आपली जागा भाडेतत्त्वावर दिली होती. जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील अधिक तपास करत आहेत.








