फत्तेपूर येथे शेतकऱ्याचे ५० हजारांचे नुकसान
जामनेर (प्रतिनिधी):- तालुक्यातील जळोद्री शिवारात वीज वितरण कंपनीच्या तारांच्या घर्षणामुळे लागलेल्या भीषण आगीत एका शेतकरी कुटुंबाचे मोठे नुकसान झाले आहे. या आगीत सुमारे २ एकर क्षेत्रातील काढणीला आलेला ५० क्विंटल मका जळून खाक झाला असून, यामुळे शेतकऱ्याचे अंदाजे ५० हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.


जळोद्री येथील रहिवासी भारत सुपडू सुरवाडे (वय ५५) हे रविवारी, ५ एप्रिल रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास आपल्या कुटुंबासह गट क्रमांक १४ मधील शेतात मका कापणीचे काम करत होते. दरम्यान, शेतावरून गेलेल्या महावितरणच्या वीज वाहक तारांचा एकमेकांना स्पर्श होऊन मोठा घर्षण झाले. या घर्षणामुळे निघालेली आगीची ठिणगी खाली असलेल्या सुक्या मका पिकावर पडली.
उन्हाचा तडाखा आणि वाऱ्यामुळे आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केले. डोळ्यादेखत दोन एकर शेतातील मका पीक आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या घटनेत सुमारे ५० क्विंटल मक्याचे नुकसान झाले आहे. मजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या सुरवाडे कुटुंबावर या संकटामुळे मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.
या घटनेबाबत फत्तेपूर पोलीस स्टेशनमध्ये ‘अकस्मात आग’ म्हणून नोंद करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच सपोनि अंकुश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सचितानंद अहिरे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळेच ही आग लागल्याची चर्चा परिसरात होत असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तातडीने भरपाई मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.









