पुढील वर्षी अभय योजना नाही; महापौर दीपमाला काळे यांचे आवाहन
जळगाव (प्रतिनिधी) :- जळगाव शहर महानगरपालिकेतर्फे शहरातील मालमत्ता धारकांसाठी लागू करण्यात आलेल्या ‘शास्ती माफी’ अभय योजनेची मुदत आता संपत आली असून, नागरिकांनी ३१ मार्चपर्यंत या सुवर्णसंधीचा लाभ घेण्याचे आवाहन महापौर दीपमाला काळे यांनी केले आहे. विशेष म्हणजे, ही शास्ती माफीची शेवटची संधी असून पुढील वर्षी अशी कोणतीही योजना राबविली जाणार नसल्याचे महापौरांनी स्पष्ट केले आहे.


काय आहे अभय योजना?
जळगाव शहरातील नागरिकांकडून वारंवार होणाऱ्या मागणीचा विचार करून महानगरपालिकेने ५ मार्च ते ३१ मार्च २०२६ या कालावधीसाठी मालमत्ता करावरील शास्ती (दंड) माफीसाठी अभय योजना सुरू केली आहे. ज्या नागरिकांचा मालमत्ता कर थकीत आहे, त्यांना या योजनेअंतर्गत दंडाच्या रकमेत मोठी सवलत मिळत आहे.
नागरिकांना कर भरणा करणे सोयीचे व्हावे यासाठी मनपा प्रशासनाने विविध ऑनलाइन पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. यात प्रामुख्याने क्यूआर कोड (QR Code), नेट बँकिंग आणि डेबिट/क्रेडिट कार्ड, यूपीआय ॲप्स (PhonePe, Google Pay) या डिजिटल माध्यमांचा वापर करून नागरिक घरबसल्या किंवा मनपाच्या केंद्रांवर आपला कर भरू शकतात.
या संदर्भात बोलताना महापौर दीपमाला काळे म्हणाल्या की, “नागरिकांच्या हितासाठी आम्ही ही अभय योजना राबविली आहे. मात्र, ही शेवटची संधी आहे. ३१ मार्चनंतर कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ मिळणार नाही आणि पुढील वर्षी देखील अशी योजना येणार नाही. त्यामुळे जळगावकरांनी दंडाची रक्कम वाचवण्यासाठी आणि शहराच्या विकासात हातभार लावण्यासाठी तातडीने थकबाकीमुक्त व्हावे.” या निर्णयामुळे प्रामाणिक करदात्यांना दिलासा मिळाला असून, शेवटच्या आठवड्यात कर भरण्यासाठी नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता आहे.









