जळगाव शहरातील आदर्श नगर परिसरातील सिटी सर्व्हे नंबर ६१०६ ची नोंदणी थांबवण्याचे आदेश
जळगाव (प्रतिनिधी) :- सिटी सर्व्हे नंबर ६१०६ आदर्श नगर परिसरातील या मालमत्तेच्या वारस हक्कावरून वाद निर्माण झाला असून, प्रशासनाची दिशाभूल केल्याचा प्रकार समोर आला आहे. एका महिलेने चुकीची माहिती देऊन मालमत्ता स्वतःच्या नावे करून घेतल्याचा संशय व्यक्त होत असल्याने, नगर भूमापन अधिकाऱ्यांनी या मालमत्तेचे कोणतेही खरेदी व्यवहार किंवा दस्त नोंदवू नयेत, असे आदेश दुय्यम निबंधकांना दिले आहेत.


ही मालमत्ता मूळ मालक कै. पंढरीनाथ धोंडू धांडे यांच्या नावावर होती. त्यांच्या निधनानंतर रत्नाबाई वासुदेव पाटील यांनी ७ जुलै २०२५ रोजी अर्ज करून, आपण पंढरीनाथ धांडे यांची एकुलती एक मुलगी आणि कायदेशीर वारस असल्याचे सांगितले होते. या माहितीच्या आधारे महसूल विभागाने त्यांच्या नावे वारस नोंद मंजूर केली होती. मात्र, ५ मार्च २०२६ रोजी अरुण पंढरीनाथ धांडे यांनी नगर भूमापन कार्यालयात तक्रार दाखल केली.
त्यांच्या तक्रारीनुसार, रत्नाबाई पाटील यांनी दिलेली माहिती खोटी असून धांडे यांना रत्नाबाईंशिवाय इतरही अनेक वारस आहेत. यात शकुंतला पंढरीनाथ धांडे, प्रकाश पंढरीनाथ धांडे, अरुण पंढरीनाथ धांडे, रवींद्र पंढरीनाथ धांडे, तिलोत्तम विकास धांडे, ज्ञानेश्वर विकास धांडे, पौर्णिमा विकास धांडे असे वारस आहेत.
इतर मालमत्तांवर या सर्व वारसांची नावे आधीच नोंदवलेली असल्याचेही तक्रारीत नमूद केले आहे. रत्नाबाई पाटील यांनी आपण एकमेव वारस असल्याचे भासवून तहसील कार्यालय व नगर भूमापन कार्यालयाची दिशाभूल केल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत नगर भूमापन कार्यालयामार्फत सध्या सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे.









