धरणगाव तालुक्यातील घटना
धरणगाव (प्रतिनिधी):- कर्जाचा विळखा आणि बँकांच्या वसुलीच्या तगाद्यामुळे हताश झालेल्या धरणगाव येथील एका बागायतदार शेतकर्याने मृत्यूला कवटाळले आहे. गेल्या तीन दिवसांपासून मृत्यूशी झुंज देणाऱ्या संजय मगन महाजन (वय ५३) यांचा आज पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे धरणगाव तालुक्यात मोठी शोककळा पसरली आहे.


धरणगाव येथील ‘मोठा माळीवाडा’ परिसरातील रामायण मढी जवळ राहणारे संजय महाजन हे प्रगतशील शेतकरी होते. काही वर्षांपूर्वी त्यांच्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला होता. त्यावेळी त्यांनी स्वतःच्या घरातील सोन्याचे दागिने आणि शेतीचा काही हिस्सा विकून लाखो रुपयांच्या कर्जाची परतफेड केली होती. मात्र, नियतीला काही वेगळेच मान्य होते. गेल्या काही काळापासून ते पुन्हा कर्जाच्या चक्रव्यूहात अडकले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, तीन दिवसांपूर्वी एका पतसंस्थेचे पथक कर्ज वसुलीची नोटीस घेऊन त्यांच्याकडे आले होते. आधीच आर्थिक विवंचनेत असलेल्या महाजन यांचे धैर्य या नोटीसमुळे पूर्णपणे खचले. हताश होऊन त्यांनी आपल्या शेतातच कीटकनाशक प्राशन केले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र आज त्यांची प्राणज्योत मालवली. पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे.









