बीड (वृत्तसंस्था ) ;- आरोग्य प्रशासनाने दिलेले होम क्वॉरंटाईनचे आदेश झुगारून मसरतनगर भागातील कुटुंब शहरामध्ये मोकाट फिरत होते. शहरात सर्वत्र फिरुन शहरवासियांचा जीव धोक्यात घालणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. प्रशासनाने बीड शहरातील आठ जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला असून होम क्वॉरंटाईनचे नियम मोडणाऱ्यांविरूद्ध प्रशासन कडक कारवाई करत आहे.
बीड शहरातील मसरतनगर भागातील एक कुटुंब हैदराबादहून बीडमध्ये परतले होते. त्यातील काही व्यक्तींना कोरोनाची लागण झाली होती. तर इतर व्यक्तींचे स्वॅब घेतल्यानंतर त्यांना होम क्वॉरंटाईन करण्यात आले. त्यांना घरातच थांबण्याचे सक्त आदेश आरोग्य प्रशासनाने दिले असताना मसरतनगर भागातील या कुटुंबाने प्रशासनाचे आदेश झुगारले आणि ते संपूर्ण शहरामध्ये फिरत होते. ते एका लग्न समारंभाला गेले, पार्ट्या केल्या, बँकेत रजिस्ट्री ऑफिसमध्येही वेळ घालावला आणि या सर्व गोष्टी प्रशासनापासून लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कोविंड सेंटरमध्ये स्वॅब देण्यास नकार देत शासकीय कामामध्ये अडथळा निर्माण केला. या सहा जणांसह इतर दोन जणांविरूद्ध बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.