चाळीसगावात धाडसी घरफोडी
चाळीसगाव (प्रतिनिधी):- शहरातील खडकी बायपास जवळील ‘आशापुरी माता प्रोव्हिजन’ या किराणा दुकानात अज्ञात चोरट्यांनी धाडसी घरफोडी करत १ लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

फिर्यादी प्रभाकर त्र्यंबक कोतेकर (वय ६२) यांचे खडकी बायपास भागात ‘आशापुरी माता प्रोव्हिजन’ नावाचे किराणा दुकान आहे. १० फेब्रुवारी २०२६ च्या मध्यरात्री १:४० ते २:३० वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी दुकानाच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेली एकूण १ लाख ५० हजार रुपयांची चिल्लर व नोटांची रोकड चोरून नेली. चोरट्यांनी अत्यंत नियोजनबद्ध रित्या विविध दराच्या नोटांवर डल्ला मारला आहे.
दि. ११ फेब्रुवारी रोजी दुपारी प्रभाकर कोतेकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चौधरी हे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक चोरट्यांचा शोध घेत आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू असून लवकरच चोरट्यांना जेरबंद केले जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.









