जळगाव तालुक्यात कुसुंबा येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी):- जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील कृष्णा कॉलनी परिसरात कबुतराच्या संशयावरून झालेल्या वादात एका १८ वर्षीय तरुणीला गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


कुसुंबा येथील रहिवासी सुनिता दीपक चव्हाण (वय ३५) यांचा मुलगा भूषण याने आपले कबुतर पकडून आणले आहे, असा संशय आरोपींना होता. याच कारणावरून ५ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ६:३० वाजेच्या सुमारास आरोपी बाबा उर्फ ईशांत पाटील आणि दुर्गेश अनिल सैंदाणे (दोन्ही रा. कुसुंबा) हे फिर्यादीच्या घरासमोर अंगणात आले. संशयित आरोपींनी जुन्या वादाची कुरापत काढून फिर्यादी सुनिता चव्हाण आणि त्यांच्या मुलांना अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. “तुम्हाला सोडणार नाही,” अशी धमकी देत आरोपींनी रस्त्यावरील दगड उचलून चव्हाण यांच्या घराच्या दिशेने भिरकावले. यावेळी एक दगड सुनिता चव्हाण यांची मुलगी रूपाली दीपक चव्हाण (वय १८) हिच्या डोळ्याला लागल्याने ती गंभीर जखमी झाली आहे.
याप्रकरणी ६ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी २:४५ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन मारुती आव्हाड आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन महाजन करत आहेत. अद्याप या प्रकरणात आरोपींना अटक करण्यात आलेली नाही.









