तरुणाची केली १ लाख ७० हजारांत फसवणूक
जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. केवळ १ लाख ७० हजार रुपयांच्या आर्थिक फायद्यासाठी स्वतःच्या आई-वडिलांनीच नातेवाईकांच्या मदतीने आपल्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह लावून दिला. याप्रकरणी ७ जणांविरुद्ध बलात्कार आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पीडित मुलगी अवघ्या १४ वर्षांची असून ती अल्पवयीन आहे हे माहित असतानाही आरोपी क्र. १ ते ६ यांनी संगनमत केले. आरोपींनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी पीडितेचे वय १८ वर्षे असल्याचे खोटे सांगून, जळगाव येथील सीता सोनू नगरमधील रहिवासी आरोपी संशयित गणेश दत्तू काथार याच्याकडून १ लाख ७० हजार रुपये घेतले. ही रक्कम स्वीकारून त्यांनी पीडितेचे लग्न गणेश काथार याच्याशी लावून दिले. लग्न लावून दिल्यानंतर पीडितेचे नातेवाईक तिला आरोपी गणेशच्या घरी सोडून निघून गेले. पीडितेचे वय १८ वर्षे पूर्ण असल्याच्या खोट्या माहितीवर विश्वास ठेवून, कोणतीही खात्री न करता आरोपी गणेश काथार याने पीडितेवर वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असूनही तिच्यावर अत्याचार केल्याने हा गंभीर गुन्हा घडला आहे.
याप्रकरणी ५ फेब्रुवारी रोजी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. कन्हैयालाल चुनीलाल पटेल (वडील), संगीता कन्हैयालाल पटेल (आई), कविता पटेल (बहीण), पूनम वर्मा (आत्या), राणीताई किन्नर (रा. उधना, गुजरात), मनिषा संजय जैन ७) गणेश दत्तू काथार (वर/पती) हे संशयित आरोपी आहेत. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि अनंत भटू अहिरे (जळगाव तालुका पोलीस स्टेशन) हे करत आहेत. या घटनेमुळे जळगाव परिसरात खळबळ उडाली असून मानवी तस्करी आणि बालविवाहाच्या गंभीर प्रश्नावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.









