पिंप्राळा परिसरात पैशांच्या वादातून गोळीबार; सुदैवाने फिर्यादी थोडक्यात बचावला

ऐन निवडणुकीच्या दिवशी घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, संशयित आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती
जळगाव प्रतिनिधी : शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच, पिंप्राळा परिसरातील आनंद मंगल सोसायटीजवळील हनुमान मंदिराजवळ वैयक्तिक वादातून गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिस्त्री कामाच्या थकीत पैशांच्या वादातून हा प्रकार घडला असून, सुदैवाने यात कोणालाही दुखापत झालेली नाही.
संशयित आरोपी तुषार सोनवणे याच्याकडून मिस्त्री कामाचे अंदाजे १ लाख ७० हजार रुपये मुस्तफाकडे थकलेले होते. वारंवार मागणी करूनही मुस्तफा पैसे देण्यास टाळाटाळ करत होता. गुरुवारी मतदानाच्या दिवशी आनंद मंगल सोसायटी येथील हनुमान मंदिराजवळ मुस्तफा आणि तुषार सोनवणे हे समोरासमोर आले. यावेळेला पैसे देवाणघेवाणीचा वाद पुन्हा उफाळला. संतापलेल्या तुषार सोनवणे याने गुरुवारी मुस्तफावर गोळीबार केला.

संशयिताने एक राउंड फायर केला. घटनास्थळी पोलिसांना बंदुकीची रिकामी पुंगळी सापडली आहे. हा प्रकार पूर्णपणे वैयक्तिक वादातून झाला असून, सुरू असलेल्या निवडणुकांशी याचा कोणताही संबंध नसल्याचे अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी स्पष्ट केले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, डीवायएसपी नितीन गणापुरे,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड आणि रामानंदनगर पोलीस स्टेशनचे निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
फिर्यादी मुस्तफा याने रामानंदनगर पोलीस स्टेशन गाठले असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी स्वतः पोलीस ठाण्यात आणि घटनास्थळी उपस्थिती देऊन फिर्यादीकडून घटनेची सविस्तर माहिती घेतली.दोन्ही व्यक्ती पिंप्राळा परिसरातील रहिवासी असून, या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते. संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती असून पुढील तपास रामानंदनगर पोलीस करत आहेत.









