महायुतीतील पक्षांतरामुळे प्रभाग १७ मध्ये मतदारांचा संताप
जळगाव (विशेष प्रतिनिधी) : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग १७ मध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रबळ दावेदार मानले जाणारे उमेदवार ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून ‘घड्याळ’ चिन्हावर निवडणूक लढवत असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “पक्षाशी निष्ठा राखण्याऐवजी केवळ सत्तेसाठी चिन्ह बदलणे चुकीचे आहे,” अशी भावना प्रभागातील मतदारांकडून व्यक्त होत आहे.

प्रभाग १७ मध्ये भाजपने मोठी ताकद पणाला लाऊन तिथे अनेक वर्षांपासून पक्षाचे काम करणाऱ्या प्रमुख नेत्याला भाजपकडून ‘कमळ’ चिन्हावर उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, भाजपच्या मोठ्या नेत्यांच्या राजकीय गणितांमुळे त्यांनी भाजपच्याच उमेदवारांना अचानक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) प्रवेश करून ‘घड्याळ’ हातावर बांधायला सांगितले.यामुळे सामान्य नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
निवडणुकीवर काय परिणाम होणार?
चिन्ह बदलल्यामुळे प्रभाग १७ मध्ये आता तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. मूळ मतदारांमध्ये फूट पडल्यास याचा फायदा विरोधी उमेदवारांना होऊ शकतो.निष्ठावान कार्यकर्त्यांच्या नाराजीचा फटका बसू नये म्हणून राष्ट्रवादीच्या वतीने आता डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न सुरू झाले आहेत, अशी माहिती मिळाली आहे. मात्र, “आधी निष्ठा मग मत” असा पवित्रा घेतलेल्या नागरिकांचे मन वळवणे हे महायुतीच्या उमेदवारासाठी मोठे आव्हान असणार आहे. महाविकास आघाडीकडे प्रभाग १७ मधील नागरिकांचा कल दिसून येत आहे. यात मशाल चिन्हावर असलेल्या शिवसेना उबाठा उमेदवारांना मोठी पसंती मिळत आहे.
प्रभागातील नागरिकांच्या मते, राजकारणात ‘पक्षाप्रती निष्ठा’ हा सर्वात महत्त्वाचा गुण असतो. सोशल मीडिया आणि स्थानिक कट्ट्यांवर आता महायुतीच्या चारही उमेदवारांच्या निर्णयावर टीका होत आहे. याबाबत नागरिकांचे म्हणणे आम्ही “केसरीराज”ने ऐकून घेतले.
१) निष्ठेचा अभाव: ज्या विचारधारेवर विश्वास ठेवून कार्यकर्ते सोबत राहिले, तीच विचारधारा सोडून दुसऱ्या पक्षात जाणे हा मतदारांचा विश्वासघात आहे, असे मोहम्मद शकील खान यांनी सांगितले.
२) संधीसाधू राजकारण: केवळ निवडणूक जिंकण्यासाठी चिन्ह बदलणाऱ्या उमेदवारावर उद्या विश्वास कसा ठेवायचा ? हे नक्की विकासासाठी उभे आहेत काय असा प्रश्न मतदार विचारत आहेत : हाफिज खान मोहम्मद, जळगाव.
३) प्रश्न सोडवण्याविषयी उदासीनता : प्रभागातील प्रश्न सोडवण्याविषयी महायुतीमधील उमेदवारांमध्ये उदासीनता कायम दिसून आली आहे. ही उदासीनता जर पुढील पाच वर्षात राहिली तर प्रभागाचा विकास होणार नाही त्यामुळे आता बदल झाला पाहिजे. – सचिन पाटील, जळगाव.
विशेष सर्वोत्कृष्ट प्रतिक्रिया
“आम्ही उमेदवाराच्या चेहऱ्यासोबतच पक्षाच्या चिन्हाला आणि पक्षाच्या धर्मनिरपेक्ष विचारांना मत देतो. निष्ठावान कार्यकर्त्याला राजकारणात अनन्यसाधारण महत्त्व असते, पण इथे वैयक्तिक स्वार्थासाठी निष्ठा बाजूला सारली गेली आहे. याचा परिणाम मतदानावर नक्कीच दिसेल.महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडे निष्ठावान उमेदवार दिसून येत आहे.”
– हाजी मुनव्वर खान सलीम, जळगाव









