प्रभाग ३ मध्ये विकासकामांवर शिक्कामोर्तब !
चाळीसगाव (प्रतिनिधी) – ‘द बेस्ट चाळीसगाव… द ग्रेट चाळीसगाव!’ या घोषणेसह शहरातील प्रभाग क्रमांक ३ मधील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ काल एक भव्य जाहीर सभा अतिशय उत्साहात आणि अभूतपूर्व प्रतिसादात संपन्न झाली.

यावेळी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. प्रतिभा चव्हाण तसेच नगरसेवक पदाचे उमेदवार नितीन रमेश पाटील आणि स्वाती अजय शिरुडे (वाणी) यांच्या समर्थनार्थ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवत भाजपच्या विकासकामांवर आपला विश्वास व्यक्त केला.

या महत्त्वपूर्ण सभेला स्थानिक आमदार मा. मंगेश चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री मा. एम. के. अण्णा पाटील, आणि माजी आमदार मा. साहेबरावजी घोडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
आमदार मंगेश चव्हाण यांनी आपल्या भाषणात भाजपच्या विकासकामांचा आढावा घेतला. ते म्हणाले, “गेल्या काही वर्षांत भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून प्रभागात झालेली रस्त्यांची सुधारणा, नव्या उद्यानांची उभारणी, स्वच्छता व पाणीपुरवठ्याची बळकटीकरणाची कामे ‒ हीच आमच्या विकासराजकारणाची खरी ओळख आहे. याच कामांवर नागरिकांनी ठेवलेला विश्वास कालच्या सभेतील विक्रमी उपस्थितीतून स्पष्टपणे दिसून आला.”


अनुभवी नेत्यांमुळे कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा -आ. चव्हाण
माजी केंद्रीय मंत्री एम.के. अण्णा पाटील आणि माजी आमदार साहेबरावजी घोडे यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये नवीन ऊर्जा संचारली, असे आ. मंगेश चव्हाण यांनी नमूद केले. ते म्हणाले, “या आदरणीय नेत्यांचे मार्गदर्शन मिळणे ही माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. त्यांच्या अनुभवी विचारांमुळे आणि आशीर्वादामुळे आम्हाला चाळीसगावच्या विकासासाठी अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे.”

प्रभाग क्रमांक ३ मधील नागरिकांनी दाखवलेला समर्थनाचा आणि आत्मीयतेचा प्रतिसाद आपल्यासाठी अत्यंत मोलाचा आहे. “आपण देत असलेले प्रेम आणि विश्वास हीच माझी खरी ताकद आहे,” असे आवाहन आ. मंगेश चव्हाण यांनी केले.












