जळगावात शासकीय रुग्णालयामध्ये राजकीय क्षेत्रासह नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी
जळगाव (प्रतिनिधी) :- येथील प्रभाग क्रमांक १२ चे माजी नगरसेवक बंटी उर्फ अनंत हरिश्चंद्र जोशी (वय ४८, रा. ओंकारेश्वर मंदिराजवळ, जळगा) यांनी दुपारी एक ते तीन वाजेच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवार दि. १ ऑगस्ट रोजी उघडकीस आली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.
अनंत हरिचंद्र जोशी उर्फ बंटीभाऊ हे शिवसेना ठाकरे गटातून नगरसेवक होते. गेल्या दोन पंचवार्षिकला त्यांनी नगरसेवक म्हणून काम केले आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा राजवीर असा परिवार आहे.(केसीएन) दरम्यान शुक्रवारी दि. १ ऑगस्ट रोजी खाली झोपले असताना दुपारी १ वाजतानंतर अनंत जोशी हे वरच्या मजल्यावरील खोलीत निघून गेले होते. संध्याकाळी कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ते मिळून आले नाही. घरात व शहराच्या बाहेर देखील त्यांनी तपासणी केली. अखेर संध्याकाळी वरच्या मजल्यावरील घरात पाहत असताना अनंत जोशी यांनी गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला.
यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. घटनेची माहिती मिळताच रामानंदनगर पोलीस हे घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, अनंत जोशी यांचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव या ठिकाणी दाखल केला असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मयत घोषित केले.(केसीएन)दरम्यान रुग्णालयामध्ये राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. अनंत जोशी यांच्या आत्महत्यामागील नेमके कारण समजू शकले नाही. दरम्यान हसत खेळत असणारे व्यक्तिमत्व अनंत जोशींच्या मृत्यूमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.