मुंबई (वृत्तसंस्था) – सातारा, मुसळधार पाऊस व वादळी वाऱ्याच्या तडाख्याने जिल्ह्यात बुधवारी (दि. 3) अनेक झाडे कोसळून वीजवाहक तारा तुटल्या होत्या. अनेक ठिकाणी विजेचे खांब वाकल्याने बऱ्याच भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता. या महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वीज यंत्रणेची युद्धपातळीवर अविश्रांत दुरुस्ती केल्याने जिल्ह्यातील बहुतांश भागाचा वीजपुरवठा गुरुवारी पूर्वपदावर आला आहे.


काही ठिकाणी वीजयंत्रणा जमीनदोस्त झाल्याने व मुसळधार पावसामुळे दुरुस्तीच्या कामात अडथळे येत होते. प्राथमिक अहवालानुसार जिल्ह्यात महावितरणचे 45 उच्चदाब व 220 लघुदाब वीजखांब व त्यावरील तारा वादळामुळे तुटल्याने दोन लाख 65 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. जिल्ह्यातील 14 वीज उपकेंद्रे बंद पडल्याने तब्बल 139 वाहिन्यांवरील वीजपुरवठा खंडित झाला होता. प्रामुख्याने सातारा शहर, औंध, वडूज, दहिवडी, खटाव, वाई, महाबळेश्वर, पाचगणी आदी परिसरात वादळामुळे वीजयंत्रणेला मोठा फटका बसला.
दुपारनंतर वादळ व पावसाचा जोर ओसरताच सर्व भागाचा वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले. बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील पावडे यांनी तातडीने परिस्थितीचा आढावा घेतला. प्रभारी अधीक्षक अभियंता सुनीलकुमार माने यांच्यासह सर्व अभियंते व कर्मचाऱ्यांनी दुरुस्तीची कामे सुरु केली. यामध्ये बंद पडलेली सर्व 14 उपकेंद्रे व 139 पैकी 128 वाहिन्यांवरून वीजपुरवठा बुधवारी रात्री उशिरा सुरू करण्यात आला. त्यानंतर काही रोहित्र दुरुस्ती व वैयक्तिक तक्रारी निवारणाचे काम सुरू होते.
सातारा, फलटण, कराड, वडूज, खटाव, औंध आदी भागातील वीजपुरवठा सुरू झाला. महाबळेश्वर, वाई, पाचगणी आणि तापोळा उपकेंद्राच्या परिसरात 32 उच्चदाब व 125 लघुदाब वीजखांब व तारा जमीनदोस्त झाल्या. त्या भागात जादा कर्मचारी पाठवूनही कोसळलेली झाडे व सततच्या पावसामुळे दुरुस्तीच्या कामात अडथळा येत होता. वाई शहराचा वीजपुरवठा गुरुवारी दुपारी सुरू करण्यात आला. तापोळा उपकेंद्राचा वीजपुरवठा पर्यायी व्यवस्थेतून सुरू करण्यात आला.







