धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील रहिवासी ४० वर्षीय तरुणाने राहत्या घरी शुक्रवारी दि. २१ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास छताला गळफास लावून घेत आत्महत्या केली आहे. याप्रकरणी पाळधी दूरक्षेत्र पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते.
विनोद काशिनाथ वसंतकर (वय ४०, पाळधी ता. धरणगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो आई, पत्नी, २ मुलांसह राहत होता. सेंट्रिंग काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. (केसीएन)शुक्रवारी रात्री घरी कोणी नसताना विनोद वसंतकर याने रात्री ९ वाजेच्या सुमारास छताला गळफास लावून घेत आत्महत्या केली. याप्रकरणी परिवाराला माहिती मिळताच त्यांनी तात्काळ त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले.
यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. दरम्यान, विनोद वसंतकर याचे रावेर तालुक्यात शेत आहे. या शेतीच्या वादातून त्याला २ जण त्रास देत होते. त्यामुळे त्याने आत्महत्या केली असावी असे नातेवाईकांचे म्हणणे आहे. याप्रकरणी पाळधी दूरक्षेत्र पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते.