मुंबई (वृत्तसंस्था) – बांगलादेशमधील एका कारखान्यास आज(शुक्रवार) भीषण आग लागून घडलेल्या दुर्घटनेत ४० लोकांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, या भयानक दुर्घटनेत कमीत कमी ३० जण जखमी देखील झाले आहेत. एएफपी वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे. याशिवाय, आगापासून जीव वाचवण्यासाठी अनेक कामगारांनी कारखान्याच्या इमारतीच्या वरच्या मजल्यावरून उड्या देखील मारल्या आहेत व अद्यापही अनेकजण बेपत्ता असल्याचेही सांगण्यात आले आहे.
कारखान्यात सध्या किती लोक अडकलेले आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र कारखान्याबाहेर जमलेल्या नातेवाईकांनी व अन्य काही कामगारांचे म्हटले आहे की, आतमध्ये अडकलेल्यांची वाचण्याची शक्यता कमी दिसत आहे.
अग्निशामक दलाचे प्रवक्ते देबाशीष बर्धन यांनी सांगतिले की, आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर आम्ही आतमध्ये शोध व बचावकार्य चालू ठेवू आणि एकूण मनुष्यहानी बद्दल नक्की सांगता येईल. तर, आगीमुळे कारखान्यात मोठ्याप्रमाणवर धूर पसरल्याने, अनेकांना श्वास घेण्यासही त्रास झाल्याचे समोर आले आहे.