पुणे (वृत्तसंस्था) – शहरातील मध्यवर्ती कोथरुडमधील फायनान्स कार्यालयातील महिला स्वच्छतागृहात पुरुष सहकाऱ्यानेच छुपा कॅमेरा लावून चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी अन्वेष ललितकुमार कोसे (वय 34, रा. राकुनाल आयकॉन, पिंपळे सौदागर) याच्यावर कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान या प्रकरणी विवेक विनयकुमार शेखर (वय 37, रा. वाकड) यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.


सहाय्यक पोलिस निरीक्षक आर. ए. यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोथरूडमधील किमया हॉटेलच्यावर हौसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कार्पारेशनचे कार्यालय आहे. संबंधित कार्यालयात महिला कर्मचारीही नोकरीस आहे. 2 सप्टेंबरला कार्यालयातील महिला स्वच्छतागृहाचा मुख्य दरवाजा बराच वेळ बंद असल्याचे एका तरुणीच्या निदर्शनास आले. त्यावेळी कार्यालयातील महिलेचा सहकारी अन्वेश कोसे स्वच्छतागृहातून बाहेर आल्याचे तरुणीला दिसले. तिने तत्काळ सुरक्षा रक्षकाला बोलावून स्वच्छतागृहाची तपासणी केली असता त्याठिकाणी छुपा कॅमेरा लपविला असल्याचे दिसून आले. त्यानंतर अन्वेशविरुद्ध कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या तपासासाठी पथके रवाना करण्यात आली असून लवकरच त्याला ताब्यात घेणार असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक आर. ए. यादव यांनी दिली आहे.







