चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील एका गॅस एजन्सीत भामट्याने रोखपालाला चाकूचा धाक दाखवून ३ लाख ६५ हजारांसह मोटारसायकल घेऊन तो पसार झाल्याची घटना रात्री घडली पोलिसात संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
चाळीसगाव शहरातील शांतीनगर येथे अशोक किसनचंद छाबडीया (वय- ५८) वास्तव्यास असून ते मालेगावरोडवरील एच.पी. गॅस एजन्सीत कामाला आहेत. दिवसभरात झालेल्या गॅस विक्रीचे पैसे सायंकाळी डिलीव्हरी बॉयकडून घेऊन दुसऱ्या दिवशी बॅकेत भरणा करण्याचे काम छाबडीया करीत असतात. २५ एप्रिलरोजी रात्री ८:३० वाजता छाबडीया नेहमीप्रमाणे डिलीव्हरी बॉयकडून पैसे घेऊन मोजत होते. तेवढ्यात शटर वर करून भावेश मनोज माखोजा (वय- २२, रा. उल्हासनगर) हा चाकू घेऊन आत आला. छाबडीया यांना किरकोळ दुखापत करून पैसे दे अन्यथा जीवे ठार मारिन अशी धमकी देत ३,६५,००० हजार रोख व ७५ हजार रुपये किंमतीची हिरो होंडा कंपनीची दुचाकी (क्र. एम.एच. १९ डीएक्स २९१२) घेऊन पळ काढला.
या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे छाबडीया यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात भावेश मनोज माखोजा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला . पो नि के. के. पाटील , सपोनि विशाल टकले पुढील तपास करीत आहेत.