मुंबई (वृत्तसंस्था) – बॉलिवूडचा भाईजान अर्थात अभिनेता सलमान खान याचा नुकताच ‘राधे: युवर मोस्ट वॉन्टेड भाई’ हा चित्रपट ओटिटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला. यानंतर या चित्रपटाबाबत अनेक संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. इतकेच नव्हे तर अनेकांनी त्याची खिल्ली उडविली. यात सगळ्यात उपर होता तो कमाल आर खान अर्थात KRK. त्याने चित्रपटाबाबत अशी काही वादग्रस्त विधाने केली कि सलमानने थेट त्याच्यावर मानहानीचा दावा ठोकला. त्यानंतर हा वाद आणखीच विकोपाला गेला. दरम्यान सलमानच्या वकिलाने हा दावा राधेसाठी नसून वैयक्तिक बदनामी केल्याप्रकरणी आहे हे स्पष्ट केले होते. यानंतर आता सलमान खान व केआरकेमध्ये सुरू असलेल्या वादात अभिनेता गोविंदाकडून पाठिंबा असल्याचे ट्विट KRKने केले आहे. त्यामुळे पार्टनरने भाईजानला डावलले का काय असा प्रश्न उपस्थित राहत आहे.
सलमान खानच्या अंतर्गत चालणाऱ्या बीइंग ह्युमन या अधिकृत संस्थेमार्फत आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप KRK ने सलमानवर केला होता. त्याविरोधात KRK वर सलमानकडून मानहानीचा दावा करण्यात आला आहे. तेव्हापासून KRK सलमानच्या मागे हात धुऊन पडला आहे. बहुतेक त्याला धडा शिकवणारच असा ठाम निश्चय वगैरे त्याने केला असावा. यात त्याने केलेले गोविंदा संदर्भातील ट्विट पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे. ‘गोविंदा भाई, तुमच्या प्रेमासाठी आणि सहकार्यासाठी धन्यवाद. मी तुम्हाला निराश करणार नाही’, असं ट्विट KRK ने केले आहे.
अलीकडेच केआरकेच्या या वादग्रस्त विधानांवर गायक मिका सिंग आणि हनी सिंग यांनी त्याला चांगलेच फैलावर घेतले होते. मात्र त्यांच्याही अब्रूवर घाला घालण्यात केआरके नंबर वन निघाला.
या ट्विटमुळे सोशल मीडियावर अत्यंत खळबळ उडाली आहे. कित्येकांना हा प्रश्न पडला आहे कि, खरोखरच गोविंदाने सलमानविरुद्ध KRKला पाठिंबा दिला आहे? तर काहींना असं वाटत आहे कि कमाल आर खान काहीतरी उगाच खोटे सोंग आणून दाखवतोय. इतकेच नव्हे तर, गोविंदा आणि सलमान यांच्यात जुना वाद आहे, याचाच फायदा घेत KRK ने ट्विट केले असावे. असेही अनेक युजर्सच म्हणणं आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, KRK ने २०१९ सालामध्ये केलेल्या ट्विटमध्ये गोविंदावर देखील टीका केली होती. एकंदर हे सगळं पाहून असं वाटू लागलय कि, विदआऊट खर्चा होउदे चर्चा याचा अवलंब करून कमाल नवनवीन शक्कल लढवतोय.