जळगाव ( प्रतिनिधी ) – शिरसोली गावाजवळील पेट्रोल पंपाजवळ कोर्टातील केस मागे घेण्यास नकार देणाऱ्या तरुणाला चौघांनी तिक्ष्ण हत्याराने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुरुवारी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुत्रांकडुन मिळालेल्या माहितीनुसार, तुषार ईश्वर सोनवणे (वय-१८) रा. साईबाबा मंदिर जवळ, मेहरून, जळगाव हा तरुण आपल्या कुटुंबीयांसह राहायला आहे. त्याचा मित्राचा वाढदिवस असल्या कारणामुळे तुषार सोनवणे हा बुधवारी १२ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता शिरसोली गावाजवळील पेट्रोल पंपाजवळ मित्रांसोबत होता. त्यावेळी त्याच्याजवळ सनी उर्फ फौजी बालकृष्ण जाधव, शुभम पाटील, सचिन उर्फ कोंडा आणि गोलू उर्फ चेतन चौधरी चौघे रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव हे तिथे आले. त्यांनी तुषारला कोर्टात असलेले केस मागे घे असे सांगितले. त्यावरून तुषारने मी कोर्टातील केस मागे घेणार नाही असे सांगितले. याचा राग आल्याने चौघांनी तुषारला बेदम मारहाण केली. तर सनी याने त्याच्या कमरेतून तीक्ष्ण हत्यार काढून हातावर वार करून जखमी केले. जखमीवस्थेत मित्रांनी तुषारला तातडीने उचलून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. तुषार सोनवणे यांच्या फिर्यादीवरून गुरुवार १३ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजता संशयित आरोपी सनी उर्फ फौजी बालकृष्ण जाधव, शुभम पाटील, सचिन उर्फ कोंडा आणि गोलू उर्फ चेतन चौधरी चौघे रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल नितीन पाटील करीत आहे.