मुंबई (वृत्तसंस्था) – राज्यातील कोरोनाचे रुग्ण वाढीचे प्रमाण कमी होत असल्याने उद्यापासून राज्यातील महाविद्यालये सुरु होणार आहेत. मात्र मुंबई आणि उपनगरातील महाविद्यालय उद्या सुरू होणार नाहीत. महाविद्यालये सुरू करण्याबाबत स्थानिक प्रशासनाकडून कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन 22 फेब्रुवारीपर्यत विचार होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
एकीकडे राज्यभरातील विद्यापीठे त्याअंतर्गत येणारी महाविद्यालये 15 फेब्रुवारीपासून सुरू करण्याबाबत राज्य सरकारने 3 फेब्रुवारी रोजी निर्णय घेतला. तरीसुद्धा मुंबईतील महाविद्यालये उद्यापासून सुरू होणार नाहीत, अशी माहिती मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव बळीराम गायकवाड यांनी दिली आहे. विद्यापीठ महाविद्यालये सुरू करण्याबाबत निर्णय जरी राज्य सरकारने दिला असला तरी स्थानिक प्रशासन यावर कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय देणार आहे, असं शासन निर्णयात नमूद आहे. त्यानुसार मुंबई विद्यापीठाला मुंबई महापालिका आयुक्तांनी पत्र पाठवून 22 फेब्रुवारीपर्यत कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेऊन सूचना देऊ आणि त्यानंतर मुंबईतील महाविद्यालये कधी सुरु करता येतील यावर निर्णय घेऊ असं सांगण्यात आला आहे.
1 फेब्रुवारीपासून मर्यादित वेळेत का होईना सर्वसामान्य प्रवाश्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. त्यानंतर कोरोनाची नेमकी परिस्थिती कशी आहे? याचा आढावा, सर्व्हेक्षण करून स्थानिक प्रशासन महाविद्यालय सुरू करण्याबाबत सूचना देईल, असे या पत्रात आयुक्तांकडून सांगितले आहे.
मुंबई विद्यापीठांतर्गत येणाऱ्या वसई विरार, पनवेल , पालघर या क्षेत्रात महाविद्यालय सुरू करण्याबाबत स्थानिक प्रशासनाने परावनगी दिल्यानंतर या भागातील महाविद्यालय उद्या राज्य सरकारने दिलेल्या नियमावलीचा पालन करत सुरू होणार आहेत. तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागातील स्थानिक प्रशासनाने अद्याप महाविद्यालय सुरू करण्याबाबत कळवले नसल्याची माहिती आहे.