मुंबई (वृत्तसंस्था) – कोरोनाची रुग्णसंख्या राज्यात काही प्रमाणात कमी होताना पाहायला मिळत होते परंतु, मात्र आता पुन्हा कोरोना डोकं वर काढत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे जिथे कोरोनाचा संसर्ग वाढतोय, अशा शहरांमध्ये नियम कडक करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे. राज्यातील अमरावती कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाल्याने या जिल्ह्यात कोरोनाचे नियम कडकपणे लागू करण्यात आले आहेत.
आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत अमरावती जिल्ह्यात आता संचारबंदी लागू करण्यात आली आहे त्यानुसार, पाच पेक्षा अधिक लोकांना सार्वजनिक ठिकाणी एकत्र येता येणार नाही. यात्रा, उत्सव, सभा, संमेलन सगळ्यांवर बंदी राहील तसेच लग्न समारंभासाठी सशर्त 50 लोकांना परवानगी दिली जाईल. तसेच नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी सर्व आस्थापना आणि बाजारपेठा खुल्या राहतील पण प्रशासनाने गर्दीला प्रतिबंधित करणारा कायदा लागू केल्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाभरातील शाळांना 28 फेब्रुवारी पर्यंत सुट्टी जाहीर केली आहे. शनिवारी एकाच दिवसात 376 कोरोना रुग्ण आढळून आल्याने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी हा निर्णय घेतला आहे. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करता प्रशासनाने यामधून सुट दिली आहे. फक्त दहावी बारावीचे कोचिंग आणि महाविद्यालयीन वर्ग वगळता इतर सर्व शाळा आणि महाविद्यालय बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
नवीन वर्षात संपूर्ण राज्यातील कोरोना रुग्णांचा चढता आलेख उतरतांना दिसत होता तोच आता फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात पुन्हा त्याने उसळी मारली आहे. अमरावतीमध्ये 10 फेब्रुवारीपासून सलग 300 पेक्षा जास्त रुग्णांचा कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह येत होता, हाच आकडा जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात शंभरच्या आत असल्यामुळे प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेत हा मोठा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत अमरावती मध्ये 24895 कोरोनाग्रस्त रूग्णांची नोंद झाली आहे. अमरावतीमध्ये लागू झालेल्या आदेशानंतर आता महाराष्ट्रातील इतर ठिकाणी हा आदेश लागू होणार का? आणि कोरोनाची लस आली असताना देखील रुग्णसंख्या वाढत आहे, त्यामुळे पुढील काळात कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येणार का? हा प्रश्न जनसामान्यांना पडला आहे.