कोयत्यासह घरात घुसून दहशत; सात जणांविरुद्ध गंभीर गुन्हा

जीवे मारण्याची धमकी व दगडफेक ; लक्ष्मी नगरातील घटना
जळगाव | प्रतिनिधी
जळगाव शहरातील लक्ष्मीनगर परिसरात जुन्या वादातून एका तरुणाच्या घरात घुसून कोयत्याच्या धाकावर जीवे मारण्याची धमकी देत दगडफेक केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी आकाश अजय सोनार (वय २६, रा. लक्ष्मीनगर, जळगाव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, २ ऑगस्ट २०२६ रोजी पहाटे सुमारे १.३० वाजता ही घटना घडली.
फिर्यादीनुसार, बबलू हीरामण धनगर, अविनाश राठोड, गणेश दंडगव्हाळ, जिगर बोंडारे तसेच त्यांच्यासोबत आलेल्या आणखी तीन अनोळखी साथीदारांनी संगनमताने फिर्यादीच्या घरात अनधिकृतपणे प्रवेश केला. आरोपींपैकी एकाच्या हातात कोयता होता. त्यांनी फिर्यादीच्या आईला शिवीगाळ करत, “आकाश कुठे आहे, आज त्याचा मर्डर करतो,” अशी धमकी दिली.
फिर्यादी घरात न सापडल्याने आरोपी घराबाहेर आले आणि घरावर दगडफेक करून दहशत निर्माण केली. हा प्रकार जुन्या भांडणाच्या कारणावरून झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६३९/२०२६ नोंद करण्यात आला असून, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३३३, १८९(२), १९०, १९१(२), १९१(३), ३५१(२) व ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोहेकॉ. रमेश चौधरी करीत आहेत.









