जळगाव (प्रतिनिधी) – जिल्हा परिषदेमधील एका वरिष्ठ अधिकार्यासह बांधकाम, शिक्षण, समाजकल्याण आणि आरोग्य विभागातील काही अधिकार्यासह कर्मचारी असे एकूण शंभर जण जिल्हापरिषदेत आतापर्यंत कोरोना पॉझिटीव्ह झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
जळगाव जिल्ह्यातील मिनीमंत्रालय समजल्या जाणार्या जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील अग्रदूत ग्रामसेवकही पॉझिटीव्ह आल्याने अर्धी जिल्हा परिषद कॉरंटाईन झाली आहे. गेल्या काही दिवसांपुर्वी जिल्हा परिषदेमधील बांधकाम विभागातील तीन कर्मचारी कोरोना बाधित झाल्याची बाब उघडकीस आली होती. त्या पाठोपाठ जिल्ह्यातील ग्रामीण भागात गावपातळीवर काम करणारा ग्रामसेवकही कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागातील डॉक्टर्स, कर्मचारी आणि अधिकारी, कर्मचारी मार्च महिन्यापासून रात्रंदिवस सेवा बजावत आहेत. मात्र, कोरोनाचा जळगाव जिल्ह्यात उद्रेक वाढत आहे. पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कात आल्यामुळे अधिकारी व कर्मचार्यांंनाही कोरोनाची लागण झाल्याने काही जण उपचार घेत आहेत. तर काही बरे होवून पुन्हा कामावर रुजू झाले आहेत. मात्र, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी स्वरक्षणासाठी मास्क आणि सॅनिटाझरचा वापर करणे गरजेचे आहे.