पाचोरा ( प्रतिनिधी ) – पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा बुद्रुक येथील ३३ वर्षीय तरूणाचा झाडावर असतांना पाय घसरून खाली पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा बुद्रुक येथील दत्तवाडीत राहणारा रविंद्र वसंत महाडिक (वय-३३) हे खडकदेवळा शिवारात घरगुती वापरासाठी लाकूड तोडण्यासाठी गेला होता. दरम्यान रविंद्र महाडिक हे एका झाडावर चढले असता झाडावरुन त्यांचा अचानक पाय घसरून ते खाली पडले. रविंद्र महाडिक यांना ललित बाबु सुर्यवंशी यांच्या मदतीने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी रविंद्र महाडिक यांना मृत घोषित केले. मयत रविंद्र महाडिक यांचे पाश्चात्य वृद्ध आई असुन रविंद्र महाडिक यांच्या अकस्मात मृत्यूने खडकदेवळा परिसरात शोककळा पसरली आहे.