भुसावळ तहसीलदारांची माहिती
जळगाव (प्रतिनिधी) : राज्यातील कृषि क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करुन शासनाच्या विविध योजनांचा जलद गतीने व परिणामकारकरित्या लाभ घेणे सुलभ व्हावे, या करीता केंद्र शासनामार्फत ॲग्रिस्टॅक योजना राज्यात राबविण्यास मान्यता देण्यात आलेली आहे, योजनांसाठी ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत फार्मर आयडी बनविण्याचे आवाहन भुसावळ तहसीलदार यांनी केले आहे.
भुसावळ तालुक्यात ॲग्रिस्टॅक या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, कृषी सहाय्यक व सेवा केंद्र चालक यांची भुसावळ तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक २० जानेवारी रोजी उपविभागीय अधिकारी, भुसावळ यांच्या कार्यालय येथे बैठक घेऊन प्रशिक्षण वर्ग आयोजीत करण्यात आला होता. योजनेअंतर्गत शेतकरी खातेदार यांना फार्मर आयडी प्राप्त होणार आहे. ज्या शेतकऱ्यांचा फार्मर आयडी तयार होणार आहे त्यांना शासनाकडुन विवीध योजनेचा लाभ जलदगतीने मिळणार आहे. जसे पि.एम. किसान सन्मान योजना, पिक विमा योजना, पिक कर्ज, नुकसान भरपाई अनुदान डीबीटीदवारे वाटप, हवामान डेटा, मृदा आरोग्य माहिती पिकाबदददल सल्ला तसेच शासनाच्या विविध योजनांच्या लाभाचा यात सामावेश आहे.
सर्व शेतकरी यांनी फार्मर आयडी तयार करुन घ्यावी असे आवाहन भुसावळचे तहसिलदार यांच्याकडुन करण्यात आले आहे. भुसावळ तालुक्यात एकुण २५ हजार ४०० खातेदार यांची फार्मर आयडी तयार करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. फार्मर आयडी करण्याकरिता गावातील तलाठी, महा ई-सेवा केंद्र, ग्रामपंचायत संग्राम केंद्र, सीएससी चालक यांच्याकडून शेतकरी यांची नोंदणी करुन घ्यावी. या योजनेत नोंदणी करण्याकरीता केवळ आधारकार्ड व आधारकार्डशी संलग्नीत मोबाईल क्रमांक शेतकरी आवश्यक आहे. आज दिनांक २१ जानेवारी पासुन कॅम्पमोडवर सर्व गावात विशेष शिबीरे आयोजीत करण्यात आलेली असुन सर्व शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन भुसावळ तहसिलदार यांनी केले आहे.