तातडीने रस्त्याची दुरुस्ती करण्याची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मागणी
यावल ( प्रतिनिधी ) :- यावल ते भुसावळ राज्य महामार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांचा प्रवास धोकादायक बनला आहे. विशेषतः यावल शहरातील टी-पॉइंटपासून भुसावळपर्यंतच्या सुमारे १८ किलोमीटर अंतरावरील महामार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. वाढती वाहतूक आणि जड वाहनांच्या सततच्या वर्दळीमुळे रस्त्याची अवस्था खराब झाली असून, ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
या महामार्गावरून दररोज नोकरी-व्यवसायासाठी जाणारे नागरिक, विद्यार्थी तसेच इतर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. मात्र, रस्त्यावरील खड्डे चुकवत वाहन चालवताना अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे. विशेषतः दुचाकीस्वारांना या खड्ड्यांचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे.
संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने या महामार्गाची तातडीने पाहणी करून खड्डे बुजवावेत आणि रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे यावल तालुकाध्यक्ष प्रा. मुकेश येवले यांनी केली आहे.











