जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथे कारवाई ; मध्यप्रदेशातील जंगलात केली शिकार
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील नशिराबाद येथे पुणे व नागपूर येथील भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाअंतर्गत असणाऱ्या कस्टम विभागाने धडक कारवाई करीत वाघाचे कातडे विक्रीस आणलेल्या टोळीलाकाल शुक्रवारी दि. २६ जुलै रोजी सकाळी साडे आठ वाजता अटक केली आहे. दरम्यान याबाबत कस्टम विभागाने वन विभागासोबत तपास सुरू केला आहे. जळगाव न्यायालयाने टोळीतील ६ जणांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या कस्टम विभागाला गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी काल शुक्रवारी दि. २६ जुलै रोजी सकाळी साडे आठ वाजता नशिराबाद टोलनाक्याजवळ सापळा रचला. वाघाचे मोठे कातडे विक्रीस आलेल्या टोळीला त्यांनी स्थानिक वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने ताब्यात घेतले. (केसीएन)त्यांच्याकडून वाघाचे कातडे जप्त करण्यात आले असून या कातड्याची किंमत साधारण ५० ते ६० लाख रुपये असण्याचा अंदाज आहे.
या टोळीमध्ये अजवर सुजत भोसले (वय ३५ रा. हलखेडा हल्ली मु. चांगदेव ता. मुक्ताईनगर), नदीम गयासुद्दीन शेख (वय २६, रा. अहमदनगर), मोहम्मद अंतर खान (वय ५८, रा. भोपाळ, मध्य प्रदेश), रहीम रफिक पवार (वय ४०), तेवाबाई रहीम पवार (वय ३५), कगंनाबाई अजवर भोसले (वय ३० सर्व रा. हलखेडा ता. मुक्ताईनगर) या सहा जणांना अटक करण्यात आली आहे.(केसीएन)यातील मुख्य संशयित आरोपी अजवर भोसले याला घेऊन कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील वडोदा वनक्षेत्रात आणि मध्यप्रदेशात जाऊन घटनास्थळ पाहण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी अजवत भोसले याच्याकडून माहिती जाणून घेतली.
त्यानंतर या ६ जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान आज शनिवारी दि. २७ जुलै रोजी त्यांची शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात वैद्यकीय तपासणी झाल्यावर त्यांना जळगाव न्यायालयात हजर करण्यात आले. या ठिकाणी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, नाशिकच्या कस्टम विभागाने केलेल्या या कारवाईमुळे जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली असून नेमके हे वाघाचे कातडे कोण खरेदी करायला येणार होते ? हा आता तपासाचा भाग आहे.
याबाबत अधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सदरची जप्त केलेली कातडी ही तपासणीसाठी हैदराबाद येथे पाठवण्यात येणार असून यासंदर्भात संशयित आरोपींकडून अधिक तपास केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. संशयित आरोपी कडून ५ मोबाईल , २ दुचाकी व इतर साहित्य जप्त करण्यात आले.
सदरची कारवाई पुणे विभागाचे कस्टमर अधिकारी रवी रंजन, जळगावचे कस्टम अधिकारी श्याम कोठावळे, वनसंरक्षक धुळे येथील निनु सोमराज, वनसंरक्षक ए.प्रवीण, विभागीय वन अधिकारी आर. आर. सदगीर यांच्या मार्गदर्शनात यु. एम. बिराजदार, सहाय्यक वनसंरक्षक आणि वनपरिक्षेत्र अधिकारी नितीन बोरकर यांनी केली आहे. अवैधरित्या वन्य प्राणी ताब्यात ठेवू नये. त्यांची खरेदी अथवा विक्री करू नये असे कृत्य आढळल्यास टोल फ्री क्रमांक १९२६ वर संपर्क करावा असे आवाहन वन विभागातर्फे करण्यात आले आहे.