धरणगाव तालुक्यातील आव्हाणी गावातील घटना
धरणगाव (प्रतिनिधी) :- जुन्या पॉवर ट्रिलरला रंगरंगोटी करून त्यास बनावट वेष्टन लावून तालुक्यातील आव्हाणी गावातील वृद्ध महिलेची तब्बल २ लाख ४० हजारांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी एकाविरोधात धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अन्नपूर्णा खंडेराव पाटील (वय ७२, रा.आव्हाणी ता. धरणगाव) या वयोवृद्धा कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांनी शेतीसाठी ट्रॅक्टरच्या माध्यमातून शेतात टिलर करण्याचे साहित्य घेण्यासाठी पृथ्वीराज मोटर्सचे संचालक बाबुराव रावसाहेब खेडकर (रा.नेवासा, ता.शेगाव, जि.अहमदनगर) यांच्याशी १४ मार्च ते २१ सप्टेंबर २०२३ दरम्यान वेळोवेळी संपर्क साधला होता. त्यात २ लाख ४० हजार रुपये किंमतीचे पॉवर टिलर घेण्याचे ठरले व रक्कमही देण्यात आली.
बाबूराव खेडकर याने वृद्ध महिलेला ठरल्याप्रमाणे पॉवर ट्रिलर न देता किर्लोस्कर कंपनीचे बनावट लेबल लावून जुन्या मशीनला कलर देऊन ते नवे असल्याचे भासवत जुनेच पॉवर ट्रिलर दिले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर अन्नपूर्णा पाटील यांनी धरणगाव पोलिसात धाव घेत फिर्याद दिली. शनिवार,७ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता अहमदनगर येथील पृथ्वीराज मोटर्सचे संचालक बाबुराव रावसाहेब खेडकर यांच्या विरोधात धरणगाव पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार गजानन महाजन करीत आहे.