जळगाव (प्रतिनिधी) : दुचाकी खरेदीसाठी माहेरहून एक लाख रुपये आणावेत, या मागणीसाठी विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी पती आणि सासूविरुद्ध जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित विवाहितेचा विवाह २५ एप्रिल २०१८ रोजी झाला होता. त्यानंतर ती सासरी चिंचोली (ता. यावल) येथे राहत होती. विवाहानंतर २०१८ ते २०२५ या कालावधीत पती नेमीदास संजय कोळी व सासू सुलोचना संजय कोळी (दोघे रा. चिंचोली, ता. यावल) यांनी दुचाकी खरेदीसाठी माहेरहून एक लाख रुपये आणण्याची मागणी केली.
माहेरच्या कुटुंबीयांनी ही रक्कम देण्यास नकार दिल्याने आरोपींनी विवाहितेला वारंवार शिवीगाळ, दमदाटी व मारहाण केली. तसेच तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करून त्रास दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात पती व सासूविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.








