जळगाव शहरातील २४ तासात तिसरी घटना उघड
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील मानसिक स्वास्थ्य बिघडल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. विठ्ठल पेठेत एका प्रौढाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शनिवार दि. २१ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी उघड झाली आहे. गेल्या २४ तासात शहरातील तिसऱ्या व्यक्तीने गळफास घेतल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, प्रौढाच्या आत्महत्याप्रकरणी शनिपेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दशरथ प्रेमराज पाटील (वय ५०, रा. विठ्ठलपेठ, जुने जळगाव) असे मयत इसमाचे नाव आहे. त्यांची पत्नी एका कंपनीत काम करते. त्यानुसार त्या कामावर गेल्या होत्या. तर मुलगा मामाकडे गेलेला असताना दशरथ पाटील यांनी घरात एकटेच असताना गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवार, २१ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी पत्नी कामावरून परतली त्या वेळी उघडकीस आली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. हे दृष्य पाहून त्यांनी हंबरडा फोडला व नातेवाईकांना माहिती दिली. घटनास्थळी शनिपेठ पोलिसांनी येऊन पंचनामा केला व पाटील यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले.
तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन पाटील यांनी त्यांना मयत घोषित केले. मयताच्या पश्चात पत्नी, मुलगा आहे. पेंटर काम करणारे दशरथ पाटील यांनी सहा महिन्यांपूर्वीच विठ्ठलपेठेत नवीन घर घेतले. तेथे ते पत्नीसोबत राहत होते तर मुलगा त्याच्या मामाकडे राहतो. या घटनेमुळे विठ्ठल पेठ, जुने जळगावात हळहळ व्यक्त केली जात आहे.