जळगाव शहरातील माउली नगर येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : येथील माउली नगरातील एका विवाहितेने विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी दि. १० जुलै रोजी सकाळी १० वाजता उघड झाली आहे. त्यांची लहान मुलगी सकाळी घरी आली तेव्हा घटना समजली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
देवयानी प्रमोद पाटील (वय २७, रा. माऊली नगर, जळगाव) असे मयत विवाहितेचे नाव आहे. त्यांचे पती प्रमोद पाटील यांची भूमी कवच नावाची कंपनी आहे. त्याद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नावर ते परिवाराचा उदरनिर्वाह करतात. त्यांचे पश्चात पती, १ मुलगा, १ मुलगी असा परिवार आहे. तर माहेर नागपूर येथील आहे. सकाळी नेहमीप्रमाणे पती कामावर गेले व मुले शाळेत गेली. त्यानंतर देवयानी यांनी विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सकाळी १० वाजता त्यांची मुलगी शाळेतून घरी आली जेव्हा शेजारील मावशीला घेऊन घरात गेली.
त्यावेळेला देवयानी यांनी विष घेतल्याचे दिसून आले. त्यांना शेजारच्या नागरिकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी देवयानी यांना मयत घोषित केले. यानंतर कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते.