धरणगाव तालुक्यातील लाडली येथील घटना
शरद पोलाद सोनवणे (वय-३६, रा. लाडली ता.धरणगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. शरद सोनवणे हा तरुण कुटुंबीयांसोबत राहत होता. दिनांक २५ जुलै रोजी दुपारी ३ वाजता त्याने आपल्या शेतात फवारणीसाठी वापरले जाणारे विषारी औषध सेवन केले. या घटनेनंतर त्याची प्रकृती गंभीररीत्या बिघडली. कुटुंबीयांनी त्याला तात्काळ जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
गेले काही दिवस त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते, परंतु उपचाराला प्रतिसाद न मिळाल्याने मंगळवारी, २९ जुलै त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे लाडली गावावर आणि सोनवणे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. विष घेण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. या घटनेप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल संदीप खंडारे करत आहेत.