जळगाव (प्रतिनिधी) – येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी तथा माजी महानगराध्यक्ष विनोद देशमुख यांना पक्षविरोधी कारवाया केल्या, तसेच पक्षातील महिलांविषयी अपशब्द वापरले म्हणून प्रदेक्षाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या सूचनेनुसार पक्षातून निलंबित करण्यात आल्याचे पत्र प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी मंगळवारी दि. ६ ऑक्टोबर रोजी काढले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महानगराध्यक्ष, युवक अध्यक्ष तसेच पदाधिकारी म्हणून विनोद देशमुख यांनी पदे भूषविली आहेत. पक्षात असतांना अनेक आंदोलने, तसेच काही प्रश्नांवर त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले होते. दरम्यान, पक्षामध्ये वाढत्या कुरबुरी, मतभेद अनेकवेळा दिसून आले होते. यात विनोद देशमुख यांच्या विरोधात अनेकांनी तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी दि. ६ ऑक्टोबरला पत्र काढून विनोद देशमुख यांना पक्षातून निलंबित केले आहे.
पत्रामध्ये म्हटले आहे कि, जळगाव शहर व ग्रामीण भागातील अनेक महिला पदाधिकाऱ्यांच्या विषयी तुम्ही आक्षेपार्ह पोस्ट टाकून बदनामी केली आहे. महिला पदाधिकाऱ्यांच्या खोट्या तक्रारी करून खालच्या पातळीवरील भाषा वापरून त्यांना धमक्या देणे अश्या प्रकारचे कृत्य केल्याच्या तक्रारी प्रदेश कार्यालयात आल्या आहेत. तसेच २०१९ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम केल्याचे निदर्शनात आले आहे. याबाबत खुलासा मागूनही तुम्ही तो दिलेला नाही म्हणून पक्षशिस्त भंग केल्याने प्रदेक्षाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या सूचनेनुसार पक्षातून निलंबित करण्यात येत असल्याचेही पत्रात म्हटले आहे.
दरम्यान विनोद देशमुख यांच्याशी संपर्क केले असता, त्यांच्या मातोश्रींचे चार दिवसापूर्वी निधन झाले असल्यामुळे त्या दुःखात असल्याने ते काही सांगू शकले नाही.







