जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :तालुक्यातील शिरसोली नायगाव शेत शिवारात काम करीत असताना एका शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडून तो जागीच मृत्यूमुखी पडल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दि. २० ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली असून शेतकऱ्यांसह एक म्हैसदेखील ठार झाली आहे. . याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते.
त्र्यंबक ओंकार अस्वार (बारी, वय ६८, रा. पाण्याच्या टाकीजवळ,कुऱ्हाडदा रोड , शिरसोली प्र. न. ता. जि. जळगाव) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. ते गावात पत्नी, १ मुलगा, ४ मुली, नातवंडे यांच्यासह राहत होते. शेतीकाम करून ते परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. (केसीएन)मंगळवारी दि. २० रोजी दुपारी मुसळधार पाऊस झाला. जळगाव तालुक्यात शिरसोली जवळ असणाऱ्या नायगाव शिवारातील सज्जन शाह बाबा दर्ग्याजवळ असणाऱ्या शेतात त्र्यंबक अस्वार (बारी) हे आपले शेत गट क्रमांक १६३ -२-अ -१ येथे काम करीत होते. दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह अचानक पाऊस सुरु झाला.
त्यावेळी शेतात वीज अंगावर पडून त्र्यंबक अस्वार हे २० फुटांपर्यंत फेकले गेल्याने ते जागीच ठार झाले. तसेच त्यांची म्हैस देखील ठार झाल्याची हि घटना जवळच असणाऱ्या बकऱ्या चरणाऱ्या व्यक्तीच्या लक्षात आल्याने त्याने तातडीने आजूबाजूच्या शेतकऱ्यांना आरडाओरडा करून हि माहिती दिली . त्यानंतर शेतकऱ्यांनी तात्काळ बैलगाडीतून अस्वार अण्णा गावात आणून त्यानंतर त्र्यंबक बारी यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. रक्षा रोकडे यांनी त्यांना तपासून मयत घोषित केले. या प्रसंगी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते.