भुसावळ तालुक्यातील तळवेल येथील घटना
भुसावळ (प्रतिनिधी) – तालुक्यातील तळवेल येथील तरुण शेतकरी शेतात कांद्याच्या पिकाला पाणी देण्यासाठी विजेचा पंप सुरु करीत असताना त्याला विजेचा जबर धक्का बसला. त्यात त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवार दि. १९ रोजी घडली. याप्रकरणी वरणगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
तळवेल येथील निलेश उर्फ सोपान गोपाळ पाटील (वय ४६) हे शेतात मंगळवारी पहाटे शेतातील कांदा पिकाला पाणी देण्यासाठी विज पंप सुरु करीत होते. त्यावेळी अचानक त्यांना विजेचा जबर धक्का बसला. त्यात ते खाली जमीनीवर कोसळून बेशुद्ध अवस्थेत पडले. त्यावेळी आजूबाजूच्या ग्रामस्थांनी त्यांना भुसावळ येथे खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासणीअंती मयत घोषित केले. यावेळी नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. याबाबत वरणगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्यावर तळवेल येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.