महावितरण, महापारेषण, महानिर्मिती, मेडा, विद्युत निरिक्षकांची एकत्रित आढावा बैठक
जळगाव (प्रतिनिधी) :- विजेची वितरण व वाणिज्यक हानी कमी व्हावी यासाठी प्रयत्न करतानाच विद्युत सेवेत सुधारणा करा; अशी सूचना महावितरणचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक यांनी केली. नंदुरबार आणि धुळे पाठोपाठ जळगांव येथील परिमंडल कार्यालयात गुरुवारी दि. २ नोव्हेंबर रोजी संचालक विश्वास पाठक यांनी महावितरण, महापारेषण, महानिर्मिती, मेडा आणि विद्युत निरिक्षकांची एकत्रित आढावा बैठक घेतली. या वेळी महावितरणचे मानव संसाधन संचालक अरविंद भादीकर हे उपस्थित होते.
बैठकीत ग्राहक समाधानाच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरणाऱ्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, कुसूम योजनांचामा. पाठक यांनी आढावा घेतला. विद्युत खात्यामार्फ़त करण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधांची भरीव कामगिरीचा उल्लेख केला. सुरक्षाविषयक जाणिव जागृतीमुळे कुठेही विद्युत यंत्रणेवर अपघात होऊ नयेत, असे सांगतानाच अपघात विरहीत वीज सेवा देण्याचे आवाहन त्यांनी केले.
मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजना राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे. देवेंद्र फ़डणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात ती सुरु झालेली आहे. आता ती दुसऱ्या टप्प्यात यशस्वीपणे राबविली जाते. ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला यांच्यामार्फ़त योजनेचे प्रभावी संचलन होते आहे. जळगांव परिमंडलातूनही योजनेच्या कामास गती देण्यात यावी, अशीही सुचना पाठक यांनी यावेळी केली.
सोबतच त्यांनी देयकांची वसुली आणि थकबाकी, विभाग निहाय विजेची वितरण व वाणिज्यक हानी, ती कमी करण्यासाठीच्या उपाय योजना, घरगुती-वाणिज्यक व औद्योगिक प्रवर्गातील प्रलंबित वीज जोडण्यांची स्थिती, कृषीपंपाची प्रतिक्षा यादी, वितरण रोहित्रांचे नादुरुस्तीचे प्रमाण व ग्राहकांना पुरविण्यात येणाऱ्या रोहित्रांची सद्यस्थिती, खंडित वीज पुरवठ्यांचे प्रमाण कमी करण्यासाठीचा कृती आराखडा, अपघातप्रवण ठिकाणे व त्यावरील उपाययोजना आदी महत्वपूर्ण बाबींवरही विषयनिहाय आढावा घेतला.
वीज नियामक आयोगाने निर्धारित केलेल्या वीज वितरणातील कृती मानकांनुसार सेवा देण्याचे निर्देश संचालक भादीकर यांनी दिले. आढावा बैठकीस जळगांव परिमंडलाचे मुख्य अभियंता कैलास हुमणे, महापारेषणचे मुख्य अभियंता संजय भोळे, महानिर्मितीचे मुख्य अभियंता मोहन आव्हाड, विवेक रोकडे, जळगांव महावितरणचे अधिक्षक अभियंता अनिल महाजन यांच्यासह महावितरणचे इतर कार्यकारी अभियंते, अधिकारी-कर्मचारी व वीज ग्राहक संघटनांचे व औद्योगीक वीज वापर संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्यने उपस्थित होते.