चाळीसगाव तालुक्यातील दडपिंप्री येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : चाळीसगाव तालुक्यातील दडपिंप्री गावात राहणाऱ्या एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलाने जि.प.मराठी शाळेच्या आवारातील शिसमच्या झाडाला दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना दि. १८ मे रोजी सकाळी ११.३० वाजता उघडकीस आली आहे. दरम्यान, हा त्याच शाळेचा विद्यार्थी आहे. आत्महत्या करण्याचे कारण अस्पष्ट आहे. याप्रकरणी मेहुणबारे पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
अमोल सुरेश राठोड (वय १६ रा. दडपिंप्री ता. चाळीसगाव) असे मयत मुलाचे नाव आहे. त्याच्या पश्चात आई असून त्या याच शाळेत अंगणवाडी येथे शालेय पोषण आहार बनविण्याचे काम करतात. शनिवारी दि. १८ मे रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास गावातील तो शिकत असलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या आवारात असलेल्या शिसमच्या झाडाला दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही. ही बाब परिसरातील काही तरूणांच्या लक्षात आल्याने त्यांनी तातडीने ग्रामस्थांना सांगितली.
त्याला तातडीने मेहुणबारे ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणीअंती मयत घोषीत केले. याप्रकरणी सायंकाळी ५ वाजता मेहुणबारे पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक अशोक राठोड हे करीत आहे. दरम्यान, आत्महत्येचे प्रमाण जळगाव जिल्ह्यात प्रचंड वाढत चाललेले असून समाजमन प्रचंड अस्वस्थ झाल्याचे दिसून येत आहे.