२५० पेशा जास्त महिला ग्रामपंचायत कार्यालयावर चालून गेल्या !
जळगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील वावडदा येथे आज अवैध धंदे आणि बेकायदा दारू विक्रीवरून संतप्त झालेले ग्रामस्थ आणि महिलांनी तात्काळ ग्रामसभेच्या आयोजनासाठी भाग पाडून दारूबंदीचा ठराव मंजूर करून घेतला.
वावडदा हे मोठ्या लोकसंख्येचे गाव असून काही दिवसापासून गावठी व देशी दारूची अनाधिकृत विक्री केली जात आहे. गावात अशांतता आहे. अल्पवयीन व तरुण मुले व्यसनाच्या आहारी जात आहेत मागणी करुनही अवैधधंदे बंद होत नसल्याने नागरिक व महिला संतप्त झाल्या.
. एका दारुड्याने काही दिवसापूर्वी दारूच्या नशेत दुचाकी भरधाव वेगाने चालवत एका महिलेला धडक दिल्यामुळे त्या अपघातात गरोदर महिलेचा मृत्यू झाला होता. यामुळे महिलांचा संताप अनावर झाल्याने १९ नोव्हेंबररोजी महिलांचा ताफा सरळ ग्रामपंचायत कार्यालयावर गेला आणि त्यांनी दारूबंदीचा ठराव करण्यासाठी आग्रह धरला . आज मंजूर झालेला ठराव आता ग्रामपंचायतीकडून जिल्हाधिकारी , जिल्हा परिषद , पोलीस अधीक्षकांसह सर्व संबंधित अधिकाऱ्यांना पाठवण्यात येणार आहे . दारु विक्रेत्यांवर कोणतीही ठोस कारवाई होत नाही असा आरोप वावडदे गावातील ग्रामस्थांनी केला आहे. जवळपास २५० महिलांनी दारुबंदी करण्यासाठी निवेदन तयार करत सह्यांची मोहीम राबविली होती.
अल्पवयीन व तरुण मुले व्यसनाच्या आहारी जात असल्याने भावी पिढीच्या दृष्टिकोनातून ही खेदजनक बाब आहे. बरेच लोक व्यसनपूर्तीसाठी घरातील दागिने, जीवनावश्यक वस्तू व अन्नधान्य विकून व्यसनपूर्ती करतांना दिसून येतात. गावात व घरात धिंगाणा घालून महिलांचा छळ करत असतात.
काही संसार बरबाद झाले असून बरेचसे संसार बरबादीच्या मार्गावर आहेत. गावातील अवैध दारु विक्री बंद व्हावी म्हणून महिलांनी वारंवार आवाज उठवून व अधूनमधून पोलिस कारवाई झाल्यावरही हे अवैधधंदे करणारे अवैधधंदे बंद करत नसल्याचे दिसून येते. परंतु दारु विक्रेत्यांवर कोणतीही ठोस कारवाई होत नाही असा आरोप वावडदे गावातील ग्रामस्थांनी केला आहे.
आता महिलांनी रणरागिनी सारखे उग्ररूप धारण केले गावातील जवळपास २५० महिलांनी दारुबंदी करण्यासाठी एक निवेदन तयार करत सह्यांची मोहीम राबविली या महिला थोड्याच दिवसात जिल्हा पोलिस अधीक्षक, आमदार, खासदार व मंत्रालयापर्यंत धडकणार असल्याने आता नक्कीच वावडदे गावातील दारू बंद होईल व गावात शांतता नांदेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.