गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे एल. एच. पाटील विद्यालयात आयोजन
जळगाव (प्रतिनिधी) :- येथील गांधी रिसर्च फाऊंडेशन, जळगाव यांच्या वतीने आयोजित पाच दिवसीय निवासी बाल श्रम संस्कार व व्यक्तिमत्व विकास शिबिराला आज दि. २१ मे रोजी वावडदा ता. जळगांव येथील एल.एच.पाटील इंग्लिश मेडियम स्कूल येथे उत्साही वातावरणात सुरुवात झाली. शिबिराचा शुभारंभ महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला सुती हार अर्पण करून केला.
शिबिराचे उद्दिष्ट ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या अंगभूत गुणांना वाव मिळावा, त्यांच्यातील नेतृत्वगुण, स्वावलंबन व सामाजिक भान विकसित व्हावे, तसेच त्यांच्यामध्ये नैतिक मूल्यांची रुजवणूक करणे हे आहे. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक मार्गदर्शन मिळत असून, श्रमसंस्कारांमुळे त्यांच्यामध्ये शिस्त, जबाबदारीची जाणीव आणि सेवाभाव निर्माण होतो. उदघाटन प्रसंगी वावडदा गावाचे सरपंच अनिल पाटील, सुनिल पवार, प्रशांत पाटील, पत्रकार सुमीत पाटील,अब्दुल भाई, सुधीर भाई मान्यवर उपस्थित होते. मुख्याध्यापिका जयश्री पाटील यांनी, मुले हे उद्याच भविष्य आहेत. त्यांच्यात गांधीजींनी सांगीतलेले स्वावलंबी जीवन, स्वयंशिस्त, नैतीक मुल्य रुजवणे काळाची गरज आहे असे मत व्यक्त केले.
सरपंच अनिल पाटील यांनी, विद्यार्थ्यांशी संवाद साधत शेतकरी जसे बियाणे पेरतो तसे विद्यार्थीं मध्ये चांगल्या संस्कारांचे बिज पेरण्याचे काम शिबीरात होत असते असे सांगितले. प्रथम सत्राचे प्रमुख वक्ते गिरीष कुलकर्णी यांनी “स्व ची ओळख व व्यक्तिमत्वाचा विकास कसा करावा” “चांगल्या सवयी कोणत्या” या बद्दल शिबीरार्थीना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गांधी रिसर्च फाऊंडेशनचे प्रशांत सुर्यवंशी यांनी केले, प्रास्ताविक चंद्रकांत चौधरी यांनी तर आभारप्रदर्शन विक्रम अस्वार यांनी केले. यावेळी जीआरएफचे स्वयंसेवक मयूर गिरासे, ज्योती ताई आणि परिसरातील वावडदा,रामदेववाडी,जळके,वसंतवाडी, खर्ची, रवंजे येथील ५० शिबिरार्थी विद्यार्थी उपस्थित होते. या पाच दिवसांच्या शिबिरात श्रमदान, बौद्धिक सत्रे, प्रात्यक्षिक कार्यशाळा, सांस्कृतिक कार्यक्रम, योग, समूहचर्चा व विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.