भांडण सोडविणे तरुणाच्या जीवावर बेतले
भुसावळ (प्रतिनिधी) : तालुक्यातील वरणगाव येथील तरुणांच्या खून प्रकरणी मंगळवारी रात्री ११ वाजता फिर्याद दाखल झाली आहे. यात ५ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. यातील दोघांना मलकापुरातून अटक करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. सदर घटनेत दोन जणांचे भांडण मिटविण्यास जाणे तरुणाला जीवावर बेतले आहे.
वरणगाव शहरातील गौसिया नगरात आरीफ अली समद अली हा तरूण वास्तव्याला होता. कांदे-बटाट्याचा व्यवसाय करून तो परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. गावातीलच काही जणांसोबत त्याचे जुने वाद होते. मंगळवारी दि. ४ जून रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास मराठे पान मंदिराच्या आवारात आरीफ अलीचा मित्र आकीब अली यांचे काका मुश्ताक अली लाल सैय्यद यांच्यासोबत काही तरूणांचे वाद सुरू होता. त्यावेळी तरूणांनी मुश्ताक अली याच्यावर धारदार शस्त्राने वार केले. हे पाहून आरीफ अली समद अली यांनी भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी केली. याचा राग आल्याने तरूणांनी आरीफ अलीवर चाकूने छातीत वार केल्याने त्याचा मृत्यू झाला. त्याला जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले.
याप्रकरणी रात्री ११.३० वाजता आकीब अली कमर अली याने दिलेल्या फिर्यादीवरून राहील सईद सैय्यद उर्फ पैलवान, करीम हारूण मणियार, रेहाण उर्फ बबलू खालीद सैय्यद, अरबाज सैय्यद उर्फ पैलवान, मुजाहीत सैय्यद उर्फ इंजिनिअर (सर्व रा. वरणगाव ता. भुसावळ) यांच्या विरोधात वरणगाव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेत संशयित आरोपी राहिल सईद सय्यद पहेलवान, रेहान खालीद सय्यद यांना रात्री मलकापूर येथून पकडले आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चौधरी हे करीत आहे.